केरळमधील मच्छिमारांच्या हत्येप्रकरणातील आरोपी इटलीतील दोन नाविकांवर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. मॅसिमिलानो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन अशी दोन आरोपींची नावे आहेत.
दोन्ही आरोपींवर फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेली कलमे लावण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिल्यामुळे आता आरोपपत्र दाखल करण्यामधील अडसर दूर झाला आहे. तरीही येत्या ३ फेब्रुवारीपूर्वी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. या दोन्ही नाविकांच्या अटकेवरून आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमांवरून केंद्र आणि इटली सरकार यांच्यातील वाद ३ फेब्रुवारीपूर्वी मिटवण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे त्यानंतरच आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
‘अनलॉफूल ऍक्टस अगेन्स्ट सेफ्टी ऑफ मारिटाइम नॅव्हिगेशन ऍंड फिक्स्ड प्लॅटफॉर्म ऑन कॉंटिनेंटल शेल्फ ऍक्ट, 2002’ मधील कलम ३ अ (१) नुसार कोणत्याही व्यक्तीने दुसऱया व्यक्तीची हत्या केल्यास त्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आरोपी मॅसिमिलानो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन यांच्यावर आयपीसीतील कलम ३०२ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.