पुलवामा हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास पथकाने (एएनआय) औपचारिकरित्या आपल्या हाती घेतला आहे. त्यानंतर बुधवारी त्वरीत याप्रकरणी पुन्हा खटला दाखल करण्यात आला आहे.

सेन्ट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (सीएफएसएल) तज्ज्ञांच्या मदतीने एनआयएचे १२ सदस्य यापूर्वीच श्रीनगरमध्ये पुलवामा घटनेचा तपास करीत आहे. पुलवामात ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्याठिकाणच्या स्फोटानंतरच्या अवशेषांचे नमुने आणि साक्षिदारांची माहिती एनआयएने एकत्रित केली आहे.

एनआयएच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, एनआयएने याप्रकरणी पुन्हा एकदा खटला दाखल केला आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी एक चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. देशातील दहशतवादी हल्ल्यांच्या चौकशीची जबाबदारी एनआयए सोपवण्यात येते.

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामात एक स्फोटकं भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यामध्ये घुसवून स्फोट घडवण्यात आला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.