नवी दिल्ली :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या हाती घेतला असल्याचे सोमवारी अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशावरून एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. या प्रकरणीच्या गुन्ह्य़ाबाबतची फेरनोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.

उद्योगपती अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या २० कांडय़ा असलेली एक स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारी रोजी आढळली होती. ही गाडी ऐरोली-मुलुंड पुलावरून १८ फेब्रुवारी रोजी चोरण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर या गाडीचा मालक हिरेन मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी ठाणे खाडीत सापडला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले.

राज्याच्या गृहविभागाने अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि मनसुख यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीची चोरी ही तीन प्रकरणे राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) शनिवारी सोपवली. त्यानुसार एटीएसने तपास सुरू केला. त्यास ४८ तासही पूर्ण होत नाहीत तोच एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने स्फोटकांचे प्रकरण स्वत:कडे घेतले.