अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार निदो पवित्रा यांचा १९ वर्षीय मुलगा निदो तॅनिअम याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे.
निदो तॅनिअम याच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला जबर मार लागल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. या शवविच्छेदन अहवालावरून दिल्ली पोलिसांनी आरोपी फरमन, सुंदर, पवन आणि सन्नी उप्पल या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे महानगर दंडाधिकारी पवन कुमार यांच्यासमोर सांगितले. सध्या अटकेतील सर्व आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आता खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने या आरोपींची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलीस नव्याने न्यायालयात अर्ज सादर करणार आहेत.
केसांच्या ठेवणीवरून लाजपतनगरमधील काही दुकानदारांनी २९ जानेवारी रोजी निदो तॅनिअमची थट्टा केली होती. या वेळी झालेल्या वादातून दुकानदारांनी निदोला बेदम मारहाण केल्याची तक्रार झाली होती. या मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवशी एम्समध्ये उपचारादरम्यान निदोचा मृत्यू झाला होता.