गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आल्यानंतर, हे लोक कर्करोगासारखे असल्याचा दावा गोव्याचे कला आणि सांस्कृतिकमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी रविवारी येथे केला.
या नायजेरियन लोकांची कृत्ये दूरचित्रवाणीसारख्या संवेदनाक्षम माध्यमांद्वारे जगभरात प्रसारित केली जातात, तेव्हा गोव्याची प्रतिमा बाहेर काय होत असेल, हे जाणवून आम्हाला चिंता वाटते. म्हणूनच नायजेरियन लोक कर्करोगासारखे असल्याची टीका मांद्रेकर यांनी केली.
गेल्याच आठवडय़ात अमली पदार्थाच्या व्यापारात अडकलेल्या एका नायजेरियन इसमाच्या मृत्यूप्रकरणी सुमारे २०० नायजेरियन लोकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. त्यासंदर्भात ५३ लोकांना अटक करण्यात आली होती. नायजेरियन लोकांनी रस्त्यावर येण्याचे कृत्य केल्यामुळे गोव्याच्या पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.