एकीकडे सैन्य मागे घेतलेलं असताना दुसरीकडे चीनच्या सीमेवरील उचापत्या सुरूच आहेत. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातून लष्कर मागे घेतलं गेल्यानंतर चीनचा आणखी एक डाव उघड झाला आहे. सिंथेटिक अपेर्चर रडारनं देप्सांग परिसरात काही दृश्य टिपली असून, यात चीनकडून एलएसीजवळ बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नव्या फोटोतून चीननं चौकीजवळ कायमस्वरूपी बांधकाम केल्याचं दिसत असून, २५ फेब्रवारी रोजी सॅटेलाईटने हे फोटो घेतले आहेत. ‘इंडिया टुडे’ने सॅटेलाईट इमेजच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

सैन्य मागे घेऊन सीमेवर शांतता प्रस्तापित करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलेलं असतानाच चीनकडून देप्सांग परिसरात बांधकाम करण्यात आलं आहे. भारतातील सर्वात उंचावरील हवाई तळ असलेल्या लडाखमधील दौलत बेग ओल्डीपासून २४ किमी अंतरावर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. २४ किमी अंतरावर अक्साई चीन परिसर असून इथे चिनी लष्कराची चौकी आहे. १९६२ च्या युद्धानंतर इथे ही चौकी निर्माण करण्यात आली होती. मात्र, मागील काही वर्षांपासून इथे सातत्यानं बांधकाम केलं जात आहे.

नव्यानेच टिपलेल्या सॅटेलाईट फोटोतून हे दिसत आहे की, चौकीच्या मुख्य इमारतीजवळ आणि बांधकाम करण्यात आलं आहे. हे ऑगस्ट २०२० पासून सुरू असून, कॅम्प्स आणि गाड्याही दिसत आहेत. त्याचबरोबर संरक्षक जाळीही बसवण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी रोजी सॅटेलाईटनं घेतलेल्या या फोटोतून बऱ्याच गोष्टी दिसत आहे. चिनी लष्करानं टँक आणि जवानांना भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. मुख्य इमारतीजवळ आणखी बांधकाम करण्यात आल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर सोलर पॅनल्स, अँटेना टॉवर, डिफेन्स सिस्टीम आणि भिंत बांधण्यात आलेली आहे. या परिसरात अनेक निवासगृह तयार करण्यात आलेले असून, गलवान व्हॅलीत भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे.