पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे सध्या पर्यटन विश्वात एकाच चर्चेला उधाण आलं आहे. उत्तराखंड हायकोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत रात्रीच्या वेळी तेथील पर्वतरांगावरील वास्तव्यास बंदी घालण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

उत्तराखंडमध्ये असणाऱ्या पर्वतरांगामध्ये बरेच ट्रेकर जात असून अनेकदा ट्रेकिंगदरम्यान रात्रीच्या वेळी ते याच पर्वतांचा आसरा घेत त्या ठिकाणी वास्तव्यास राहतात. मुख्य म्हणजे यामुळे उत्तराखंड पर्यटनालाही बराच फायदाही होतो. पण, आता मात्र या पर्वतरांगांवर वास्तव्य करता येणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

येत्या तीन महिन्यांमध्ये उत्तराखंडमधील डोंगरररांगांमध्ये असणारे सर्व प्रकारचे बांधकाम हटवण्याचे आदेशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये उंच ठिकाणी असणाऱ्या विस्तीर्ण पठारांवर होणारं कॅम्पिग बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात उत्तराखंडमध्ये मोठ्या ट्रेकसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या, ट्रेकर्सच्या आकड्यात घट होणार हे नक्की.

हायकोर्टाच्या या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायावर थेट परिणाम होणार असून, त्यामुळे साधारण १ लाख लोकांच्या उपजिवीकेच्या साधनावरही मोठं सावट येणार आहे. हमाल, खच्चर चालवणारे, रात्रीच्या वेळी ट्रेकर्सना जेवण पुरवणारे असे वर्ग सध्या याच गोष्टीमुळे चिंतातूर झाल्याचं कळत आहे.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

हे आहेत उत्तराखंडमधील काही महत्त्वाचे आणि मोठे ट्रेक-
रुपकुंड ट्रेक
व्हॅली ऑफ फ्लावर्स ट्रेक
पिंडारी ग्लेशियर ट्रेक
चोपटा चंद्रशिला ट्रेक
डोडीताल ट्रेक
कालिंदीखल ट्रेक
नंदा देवी ट्रेक
कुआरी पास ट्रेक
पर्यटक आणि ट्रेकिंग विश्वात अनेकांसाठी महत्त्वाचे असणारे हे ट्रेक आणि या डोंगरवाटा उत्तराखंडमध्ये ४ हजार मीटरहून जास्त उंचीवर स्थित आहेत. पण, आता येत्या काळात मात्र अनेकांनाच त्यापासून वंचित राहावं लागणार असल्याचंच चित्र दिसत आहे.