एकतर्फी प्रेमातून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करणारा मेजर निखील राय हांडा याला पटियाला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निखिल हांडा याला सहकारी अधिकारी अमित द्विवेदी यांची पत्नी शैलजा द्विवेदीची हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली कँटोन्मेंट मेट्रो स्टेशन परिसरात शैलजा द्विवेदी यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला होता.
हांडा यांना याआधी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील हांडाला शैलजाची हत्या केल्यानंतर मेऱठ कँटोन्मेंटला पाठवण्यात आलं होतं, जेणेकरुन लष्कर बोर्डाने हे प्रकरण हाताळावं. मात्र तिथे पोहोचण्याआधीच हांडाने हत्येसाठी वापरलेला चाकू फेकून दिला आणि आपले कपडे बदलले. हा अपघात वाटावा यासाठी हांडाने मृतदेहावर कार चढवली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकतर्फी प्रेमातून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करणारा मेजर निखील राय हांडा याला पोलिसांनी मेरठमधून बेड्या ठोकल्या. २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुमारे ५०० विश्रामगृहांमध्ये शोध घेतल्यानंतर २० तासांमध्ये मेजर निखील रायला अटक करण्यात यश आले. हत्येनंतर निखील पुन्हा घटनास्थळी गेला होता, पण पोलिसांना बघून तो तिथून मेरठला पळाला होता.
दिल्लीत शैलजा द्विवेदी (वय ३५) यांची शनिवारी हत्या झाली होती. शैलजा यांचे पती हे लष्करात मेजर म्हणून कार्यरत असून ते कामानिमित्त बाहेर असतात. तर शैलजा या दिल्लीतील कँटोन्मेंट परिसरात राहत होत्या. २०१५ मध्ये शैलजा यांचे पती नागालँडमधील दीमापूर भागात ड्यूटीवर असताना शैलजा यांची निखीलशी ओळख झाली होती. त्यावेळी शैलजा या पतीसह दीमापूरमध्ये राहत होत्या. मेजर निखील हांडा हा त्यांचा शेजारी होता. २०१७ मध्ये दोघांची ओळख वाढली. निखीलचे शैलजा यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. शैलजा यांचे पती हे संयुक्त राष्ट्राच्या शांती सैन्यात गेल्यानंतर निखीलने शैलजांवर लग्नासाठी दबाव टाकला. शैलजा यांना एक मुलगा असून पतीला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न कर, असा तगादा निखीलने लावला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 7:56 pm