हरयाणातील फरिदाबाद शहरात निकिता तोमर नावाच्या तरुणीची दिवसाढवळ्या महाविद्यालयाच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेत असून, निकिताच्या वडिलांनी ही हत्या लव्ह जिहादमधून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. निकिता हत्याकांडात अभिनेत्री कंगना रणौतनं ट्विट करत खळबळजनक दावा केला आहे. इस्लाम स्वीकारला नाही, म्हणून निकिताची हत्या केली, असा आरोप कंगनानं केला आहे.

आरोपी तौसीफनं निकिता तोमर हिला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला मात्र, तिने सुटका करून घेतल पळ काढल्यानंतर आरोपीनं गोळी झाडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौतनं ट्विट करत धर्मांतराचा आरोप केला आहे.

“फ्रान्समध्ये जे घडलं, त्यामुळे संपूर्ण जग धक्क्यात आहे. तरीही या जिहादींना कोणतीही लाज नाही आणि कायदा सुव्यवस्थेची भीती नाही. एका हिंदू मुलीची भरदिवसा महाविद्यालयासमोर हत्या करण्यात आली. का तर तिने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला म्हणून… यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी,” असं कंगनानं पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- Nikita Tomar Murder Case : आदल्या रात्रीचा तो कॉल, बाचाबाची अन्… ; आरोपीने दिली कबुली

“निकितानं दाखवलेलं धाडस राणी लक्ष्मीबाई, पद्मावती यांच्यापेक्षा कमी नाही. देवी निकितानं जे केलं ते जौहरपेक्षा (पती युद्धावर गेल्यानंतर राजपूत स्त्रिया अग्निकुंडात उडी घेऊन प्राणाचा त्याग करायच्या.) कमी नाही. ती संपली आहे, पण मरू शकत नाही. आपण निकिताचं बलिदान कधीही विसरू शकत नाही. मी भारत सरकारकडे विनंती करते की, देवी नीरजा यांच्याप्रमाणेच देवी निकिताचाही शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करावा,” अशी मागणी कंगनानं केली आहे.

नेमकं काय घडलं?

हरयाणामध्ये एका कॉलेजबाहेर दिवसाढवळ्या एका २० वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने या तरुणीला आधी गाडीमध्ये बसवून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने याला विरोध केल्याने या तरुणाने तिच्यावर गोळीबार केला. या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गोळी झाडणारा आरोपी हा २१ वर्षांचा आहे. हा तरुण याच मुलीच्या वर्गात होता. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.