News Flash

Nikita Tomar Murder Case : आदल्या रात्रीचा तो कॉल, बाचाबाची अन्… ; आरोपीने दिली कबुली

पोलीस चौकशीमध्ये आरोपीने केला धक्कादायक खुलासा

हरयाणामधील निकिता तोमर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या २१ वर्षीय तौसीफने आपला गुन्हा कबुल केला आहे. लग्नाला नकार देणाऱ्या २० वर्षीय निकिताचे अपहरण करण्याचा प्रयत्न सोमवारी तौसीफ आणि त्याच्या मित्राने केला. मात्र गाडीमध्ये बसण्यास नकार दिल्याने तौसीफने निकितावर गोळीबार केला. जखमी झालेल्या निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर तातडीने पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून पाच तासांमध्ये तौसीफला ताब्यात घेतलं. मंगळवारी रात्री तौसीफला मदत करणाऱ्या रेहानला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस चौकशीमध्ये तौसीफने निकिता दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करणार असल्याचे समल्याने आपण हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.

निकिता दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करण्याच्या तयारीत असल्याने आपण तिचे अपहरण करण्याचं ठरवलं आणि त्याचदरम्यान मी तिच्यावर गोळीबार केला अशी कबुली तौसीफने दिली आहे. या चौकशीदरम्यान तौसीफने हल्ल्याच्या आदल्या रात्री म्हणजेच रविवारी निकिताशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या फोन कॉलदरम्यान दोघांमध्ये बराच वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमधील या फोन कॉलसंदर्भात पोलिसांनी माहिती गोळा केली असता एक हजार सेकंदांहून अधिक वेळ म्हणजे १६ मिनिटांपर्यंत हे दोघे फोनवर बोलत असल्याची माहिती समोर आली आहे.

यापुर्वीही निकिताच्या कुटुंबियांनी तौसीफविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१८साली आम्ही या मुलाविरोधात तक्रार दाखल केली होती. तो माझ्या बहिणीला लग्नासाठी विचारुन तिचा छळ करायचा आणि तिला अपहरण करण्याच्या धमक्या द्यायचा. म्हणून आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, असं इंडिया टुडेशी या प्रकरणासंदर्भात बोलताना निकिताच्या भावाने सांगितलं. निकिताच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी तौसीफला अटक केली होती. मात्र पंचायतीसमोर दोन्ही कुटुंबांने या प्रकरणामधील तक्रार मागे घेण्यास सहमती दर्शवल्याने निकिताच्या कुटुंबियांनी तक्रार मागे घेतली.

मात्र याच अटकेचा बदला घेण्यासाठी आपण निकिताची हत्या केल्याचा दावा आता तौसीफने पोलीस चौकशीमध्ये केला आहे. “मला त्यावेळी अटक झाल्याने मेडिकलच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता आला नाही. म्हणून मी आता बदला घेतला,” असं तौसीफने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भल्लभगढमधील अग्रवाल महविद्यालयासमोर घडला. याच महाविद्यालयामध्ये मरण पावलेली निकिता शिक्षण घेत होती. परिक्षेनंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या निकिताला तौसीफ आणि त्याच्या मित्राने आडवले आणि तिला आय २० गाडीमध्ये बळजबरीने बसवू लागले. मात्र निकिताने त्याला विरोध केला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून, निकिताला गनपॉइण्टवर गाडीत बसण्यासाठी दोन्ही तरुण बळजबरी करत असल्याचं दिसत आहे. मात्र पिस्तुल दाखवून गाडीत बसण्यासाठी बळजबरी करत असणाऱ्याच्या हातून स्वत:ची सुटका करुन घेत निकिता आपल्या मैत्रिणीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मुख्य आरोपीने निकिताच्या मैत्रिणीला बाजूला करत तिच्यावर गोळी चालवली. या व्हिडीओमध्ये दुसरा आरोपीही गाडीखाली उतरुन निकिताला मुख्य आरोपीच्या दिशेने ढकलताना दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर दोघांनाही गाडीमधून पळ काढला. निकिता रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. निकिताच्या उजव्या खाद्यांला गोळी लागली होती. निकिताला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अशी झाली अटक

“ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी फरिदाबाद, पलवाल आणि नूह जिल्ह्यांमध्ये पाच तासांमध्ये अनेक पथकांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपीसहीत त्याच्या साथीदाराला सोमवारी रात्री अटक केली. २०१८ साली या तरुणीच्या नातेवाईकांनी मुलीच्या अपहरणासंदर्भातील तक्रार केल्याचे चौकशीमध्ये समोर आलं आहे. मात्र नंतर पालकांनी या प्रकरणामध्ये अधिक चौकशी न करण्याची मागणी करत तक्रार मागे घेतली होती,” असं पोलीस आयुक्त ओ. पी. सिंग यांनी सांगितलं.

कुटुंबाचे आंदोलन

मंगळवारी निकिताच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी भल्लभगढ-सोहना मार्गावर धरणे आंदोलन करत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 1:19 pm

Web Title: nikita tomar case killed her because she was about to marry someone else accused confesses to murder scsg 91
Next Stories
1 अंबानी बंधूंची Z+ सुरक्षा रद्द करा, स्वत:ची सुरक्षा व्यवस्था करु शकतात इतके श्रीमंत आहेत; सुप्रीम कोर्ट म्हणतं…
2 “माझ्या मुलाने १५ मिनिटांत करोनावर मात केली”, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3 राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं…; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
Just Now!
X