जे देश दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी नकाराधिकाराचा वापर करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करुच असे अमेरिकेने संयुक्त राष्ट्रामध्ये म्हटले. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर विरुद्ध कारवाई करण्यात येऊ नेय म्हणून चीनने नकाराधिकाराचा वापर केला आहे. दहशतवाद्यांची एक यादी आम्ही तयार केली आहे. त्यांच्या विरोधात आम्ही प्रक्रियेनुसार कारवाई करणारच आहोत असे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅले यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्यावर कारवाई करणे हे आमचे धोरण आहे असे त्या म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र परिषदेने देखील दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे परंतु काही देश नकाराधिकाराचा वापर करुन त्यांच्यावर कारवाई होऊ देत नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याचा रोख चीनकडे होता. चीनला त्यांचा नकाराधिकार वापरण्याचा अधिकार जरुर आहे परंतु ते आम्हाला जी कारवाई करायची आहे ती आम्ही करुच असे भारतीय वंशाच्या निक्की हॅलेंनी म्हटले.

सर्वांनी जर सहकार्य केले तर त्याच्यावर त्वरित कारवाई करता येऊ शकेल असे देखील त्या म्हणाल्या. अमेरिकेला दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलायची आहेत. जगात दहशतवाद वाढत असताना आम्ही हातावर हात ठेऊन चूप बसणार नाहीत असे त्या म्हणाल्या. मौलाना मसूद अजहर बाबत चीनची भूमिका अत्यंत वेगळी आहे परंतु संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये हा मुद्दा चर्चिला जावा असे त्या म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक सकारात्मक बदल घडले असून भविष्यातही हे बदल होत राहतील असे त्या म्हणाल्या.

भारतीय मातापित्यांनी दिलेल्या संस्कारांचा अभिमान – निक्की हॅले

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅले यांनी संयुक्त राष्ट्रातील परिषदेतील बैठकीदरम्यान आपल्या भारतीय माता-पित्यांचा गौरव केला. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळेच आपण आज हे कार्य जाणीवपूर्वक करू शकत असल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या भारतीय आई-वडिलांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले आहेत. जे काम तुला चांगले करता येईल आणि ज्यासाठी लोक तुला स्मरणात ठेवतील त्या प्रमाणे तू कर असा सल्ला त्यांनी मला दिला. माझ्या आई-वडिलांनी मला खंबीर बनवले असे त्या म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.