बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे स्पष्ट झालं आहे. मात्र त्याचवेळी बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. यावरुनच आता भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला असून बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> बिहारमध्ये शिवसेनेचे पानिपत; ‘नोटा’पेक्षाही कमी मतं

निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणारी शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट करत, “वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन,” असं म्हटलं आहे.


अन्य एका ट्विटमध्ये निलेश यांनी, “संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील अशी खात्री आम्हाला आहे,” असा टोला लगावला आहे.


याचप्रमाणे निलेश यांनी राहुल गांधी यांना बरंच शिकायचं बाकी असल्याचे मतही नोंदवलं आहे. “राहुल गांधींना राजकारणात बरच शिकावं लागेल. भाजपासमोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक निवडणुकीने दाखवून दिले. राहुल गांधींच्या नेहमीच्या १५ मिनिटांच्या भाषणामध्ये १२ मिनिटं फक्त मोदींची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही,” असं निलेश यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.


बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक १.७४ टक्के मतं मिळाली आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणत महाविकास आघाडीची मोट बांधणाऱ्या राष्ट्रवादीलाही बिहारमध्ये फरसे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादीला ०.२३ टक्के मतं मिळाली आहेत.