01 October 2020

News Flash

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण : निलेश राणेंनी शिवसेनाच्या ‘या’ मंत्र्याकडे राजीनाम्याची मागणी

कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला

प्रातिनिधिक फोटो

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला.  काल रात्री अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नाडीगांच्या दबावामुळे हे कृत्य केल्याची सांगितले जात आहे. मात्र आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. याच विषयावरुन भाजपावर टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निलेश राणे यांनी ट्विटवरुन उत्तर दिलं आहे. इतकचं नाही भाजपावर टीका करणाऱ्या सामंत यांनी पुतळा काढण्यासाठी जबाबदार असणाऱ्या काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसण्याऐवजी राजीनामा द्यावा असंही राणेंनी म्हटलं आहे.

काय घडलं?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बसवताना रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते. या चौथऱ्यावर त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून कन्नाडीगांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सामंत काय म्हणाले?

कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता असल्याने सामंत यांनी या प्रकरणावरुन भाजापवर निशाणा साधल्याच्या बातमीचे एक ट्विट राणे यांनी केलं आहे. यामध्ये बातमीनुसार सामंत यांनी या प्रकरणावर बोलताना, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्रात सत्तेत यायचं पण त्याच पक्षाच्या कर्नाटक सरकाने मराठी माणासाने स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकायचा. आता जनतेनं ठरवावं काय योग्य आणि काय अयोग्य. जय शिवराय,” असं मत व्यक्त केलं होतं. यावरुनच निलेश राणे यांनी हा पुतळा काँग्रेसच्या नेत्यानेच हटवल्याचा दावा करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आहेत निलेश राणे?

सामंत यांच्यावर या विषयावरुन टीका करताना निलेश यांनी वादग्रस्त ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सामंत यांचा एकेरी उल्लेख करत, “छत्रपती शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा सत्तेत आहे. हिंमत असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दे” असं म्हटलं आहे.

हा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका घेणाऱ्या स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. सीमाभागातील अनेकांनी समाज माध्यमातून पुतळा हटवण्याच्या निर्णयाचा कठोर शब्दात विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटक शासनाला वावडे आहे का? असा शिवप्रेमी नागरिकांमधून सवाल केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 3:39 pm

Web Title: nilesh rane uday samant over chatrapati shivaji maharaj statue issue comment scsg 91
Next Stories
1 “राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल, तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा”
2 पाकिस्तानातून राजस्थानात आलेल्या ११ निर्वासितांचा मृत्यू
3 मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शाह नंबर वन! ‘या’ सर्वेक्षणात लोकांनी नोंदवलं मत
Just Now!
X