जकार्ताला मुसळधार पावसाचा मोठा फटका

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये गेल्या अनेक वर्षांतील सर्वात भीषण पूरस्थिती ओढवली असून तीत नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. नववर्षांच्या पूर्वसंध्येला झालेल्या मुसळधार पावसाने या महानगरातील अनेक भाग पाण्याखाली बुडाले आहेत.

सुमारे ३० लाख लोक राहात असलेल्या जकार्ता महानगरातील पाण्याखाली असलेल्या शेकडो वस्त्यांमधील वीजपुरवठा बंद करण्यात आला असून, काही रेल्वेमार्ग आणि शहरातील एक विमानतळही बंद करण्यात आला आहे. १६ वर्षांचा एक मुलगा एका वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यानंतर विजेच्या धक्क्याने मरण पावला, तर तीन जण शरीराचे तापमान अतिशय कमी झाल्यामुळे (हायपोथर्मिया) मृत्युमुखी पडले, असे जकार्ता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुबेजो यांनी सांगितले. पुराचे पाणी ओसरेल अशी आम्हाला आशा आहे, मात्र पाऊस सुरूच राहिल्यास हे पाणीही वाढत राहील, असे ते म्हणाले.

मरण पावलेल्यांमध्ये एका जिल्ह्य़ातील घरात अडकून पडलेल्या एका वृद्ध जोडप्याचा समावेश आहे. या ठिकाणी एक नदीचे पात्र फुटल्यामुळे पुराचे पाणी १३ फूट उंचीपर्यंत चढले होते. आणखी एक जण बुडून मरण पावला, तर मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने शहराच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये दरडी कोसळल्याने चार जण ठार जाले. विजेच्या धक्क्याने आणखी बळी जाऊ नयेत म्हणून आम्ही अनेक भागांतील वीजपुरवठा बंद केला आहे, असे इखसान असाद या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. वीजपुरवठा बंद झाल्याचा किती नागरिकांना फटका बसला आहे, याची आकडेवारी आपल्याला सांगता येणार नाही असे ते म्हणाले.

नोव्हेंबरमध्ये उशिरा सुरू झालेल्या पावसाळ्यातील पुराचा जकार्ताला नेहमीच फटका बसतो.