येथून नजीकच्या करिपूर विमानतळावर गेल्या १० जून रोजी हिंसक घटनांच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) नऊ जवानांना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी या जवानांना पोलिसांकडे सोपवल्यानंतर तपास पथकाने रविवारी त्यांना अटक केली होती. मंजेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जयकुमार जॉन यांनी या नऊ जणांना न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर त्यांना कालिकत जिल्हा न्यायालयात ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीआयएसएफच्या ९ जवानांवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली, तसेच सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीआयएसएफच्या एका जवानाचा मृत्यू ओढवलेल्या हिंसक घटनेच्या संदर्भात आतापर्यंत या दलाचे १३ जवान आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) १० कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे.