अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात एका खोलीत स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होऊन नऊ जण ठार झाले. गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यात चार मुलांचा समावेश आहे.  मंगळवारी (२० जुलै) रात्री ही घटना  घडली असून यात जखमी कामगार व त्यांचे कुटुंबीय यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला, असे अहमदाबाद ग्रामीणच्या असलाली पोलीस ठाण्याचे एस.एस. गामेटी यांनी शुक्रवारी सांगितले.

मृतांमध्ये पुरुष, महिला व मुले यांचा समावेश आहे. काही लोक कारखान्यात काम करीत होते व काही जण एका खोलीत झोपले होते तेव्हा एलपीजीची गळती सुरू झाली.  जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी दार वाजवून सतर्क केले तेव्हा कामगारांनी दिवा लावला. त्यातून स्फोट होऊन आणखी मोठी दुर्घटना ओढवली. त्यावेळी तेथे दहा जण झोपलेले होते. त्यापैकी अनेक जण गंभीर भाजले. तीन जणांचा उपचारावेळी गुरुवारीच मृत्यू झाला होता. तर इतर चार जणांचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला.काही जणांवर अजून उपचार चालू आहेत.

मध्य प्रदेशात वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू

पन्ना : मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या ४ घटनांमध्ये ५ जण ठार, तर १८ जण जखमी झाले. या घटना पन्ना जिल्ह्यातील उरेहा, पिपरिया दौन, चौमुखा व सिमराखुर्द खेड्यांत शुक्रवारी घडल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी पहिल्या तीन खेड्यांमध्ये प्रत्येकी एक जण मरण पावला, तर सिमराखुर्द येथे २ महिलांचा बळी गेला. सिमराखुर्द येथे ७० वर्षांचा एक वृद्ध गुरे चारण्यासाठी जंगलात गेला असता वीज पडून मरण पावला. अशाच घटनांमध्ये एक व्यक्ती पिपरिया दौन येथे, तर ६५ वर्षांचा इसम चौमुखा येथे मृत्युमुखी पडला. या तीन खेड्यांमध्ये कोसळलेली वीज अंगावर पडून सात जण जखमी झाले, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी रचना शर्मा यांनी दिली.  उरेहा खेड्यात शेतात काम करणाऱ्या दोन महिला वीज अंगावर पडून मरण पावल्या; तर  जखमी झालेल्या ११ जणांवर पन्ना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.