प्रवासी रेल्वे गाडय़ांचा वेग वाढविण्यासाठी रेल्वेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत़  १६० ते २०० किमी प्रतितास या वेगाने प्रवासी गाडय़ा चालविता येतील, असे देशभरातील नऊ मार्ग रेल्वेने निश्चित केले आहेत़  या मार्गामध्ये आवश्यक बदल करून अतिवेगवान रेल्वेगाडय़ा चालविण्याची योजना आहे, अशी माहिती केंद्र शासनाने शुक्रवारी राज्यसभेत दिली़
दिल्ली-आग्रा, दिल्ली-चंदीगड, दिल्ली-कानपूर, नागपूर-बिलासपूर, मैसूर-बंगळुरू-चेन्नई, मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, चेन्नई-हैदराबाद आणि नागपूर-सिकंदराबाद या नऊ मार्गावर या अतिजलद गाडय़ा चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज गुप्ता यांनी राज्यसभेत दिली़  
यासाठी शताब्दी एक्स्प्रेस आणि तत्सम गाडय़ांची ३ जुलै रोजी १६० किमी प्रतितास वेगाने नवी दिल्ली-आग्रा या मार्गावर चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली़  या गाडीने नवी दिल्ली ते आग्रा हे अंतर १०२ मिनिटांत कापले, असेही गुप्ता यांनी सांगितल़े  
तसेच ‘द रॉलिंग स्टॉक लिंक हॉफमन बस्च’ (एलएचबी) डब्बे आणि इलेक्ट्रिक लोको यांची १८०च्या वेगाने तपासणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितल़े