तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील कुरानगनी हिल्स येथील जंगलात भडकलेल्या वणव्यामध्ये होरपळून ९ ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. एकूण ३६ ट्रेकर्स या जंगलात अडकले होते. थेनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी एम.पल्लवी बलदेव यांनी सोमवारी ही माहिती दिली. ३६ ट्रेकर्सपैकी २४ जण चेन्नईचे आणि १२ जण तिरुप्पूरचे निवासी आहेत. चेन्नईतल्या २४ जणांमध्ये २३ महिला होत्या तर तिरुप्पूरच्या १२ जणांमध्ये तीन महिला आणि तीन लहान मुले होती. रविवारी दुपारी कुरानगनी हिल्सच्या जंगलात अचानक भडकलेल्या वणव्यामध्ये हे सर्वजण अडकले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आयुक्त के. सत्यगोपाल यांनी ही माहिती दिली.

या सर्व ट्रेकर्सनी ओढया जवळच्या सुकव्या गवतामध्ये आसरा घेतला होता. पण आग तिथपर्यंत पोहोचली आणि सुक्या गवताने लगेच पेट घेतला अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन एअर फोर्सने या सर्वांना वाचवण्यासाठी मोठी बचाव मोहिम राबवली व २१ जणांची सुटका केली. आठ ट्रेकर्सना सर्किट हाऊस येथे पाठवण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव जे.राधाक्रिष्णन यांनी दिली.

थेनी जिल्ह्यातील कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे ३६ विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले. स्थानिक आदिवासी, पोलीस आणि बचाव पथकांनी त्यांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम राबवली. हवाई दलाच्या सुलूर येथील तळावरून दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी ट्वीटद्वारे जाहीर केले होते तसेच हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाकडून थेनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.