केरळमध्ये पुरानं हाहाकार केला असून भारतासह जगभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. अशा वेळी तामिऴनाडूमधल्या एका नऊ वर्षांच्या चिमुरडीनंही खारीचा वाटा उचलत दातृत्वाचं प्रदर्शन घडवलं आहे. या मुलीनं सायकल विकत घेण्यासाठी चार वर्षे पैसे साठवले व नऊ हजार रुपये जमा केले होते. तिनं हे पैसे केरळमधल्या पूरग्रस्तांना देण्याचं जाहीर केलं. तिच्या या संवेदनशीलतेनं प्रभावित झालेल्या अग्रणी सायकल उत्पादक कंपनीनं तिचं स्वप्न असलेली सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूमधल्या विल्लूपूरममधल्या अनुप्रिया या नऊ वर्षाच्या मुलीनं बचत करत करत चार वर्षांमध्ये नऊ हजार रुपये साठवले होते, पसंतीची सायकल घेण्यासाठी… मात्र, केरळमधल्या पूराची दृष्ये टिव्हीवर बगितल्यावर तिचा विचार बदलला आणि तिनं हे पैसे सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला. “टिव्हीवर जेव्हा पूराची दृष्ये बघितली आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैशाची गरज असल्याचे समजले तेव्हा मी त्यांच्या सहाय्यासाठी हे साठवलेले पैसे देण्याचे ठरवलं,” अनुप्रियानं पत्रकारांना सांगितलं.

तिच्या या कृतीनं दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये तिची चांगलीच प्रशंसा झाली. अनुप्रियाच्या या दातृत्वानं खुद्द हीरो ही सायकल बनवणारी कंपनीही हेलावली. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाळ यांनी तिची दखल घेतली असून कंपनीनं ट्विटरच्या माध्यमातून आपला मनोदय जाहीर केला. तुला आमच्याकडून नवी कोरी सायकल भेट देण्यात येत आहे, कृपया आमच्याशी या पत्यावर संपर्क साध, असं आवाहन हीरो सायकलनं अनुप्रियाला केलं आहे.

इतकंच नाही तर आयुष्यभर दरवर्षी एक सायकल तुला आम्ही देऊ असं आश्वासन पंकज मुंजाळ यांनी दिलं आहे. अनुप्रिया ही एक अत्यंत चांगलं ह्रदय असलेली मुलगी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हीरोच्या या कृतीचं शशी थरूर यांनी स्वागत केलं आहे. आपली सगळी पुंजी पूरग्रस्तांना देणाऱ्या या चिमुरडीला सायकल भेट देत असल्याद्दल आभार असं ट्विट थरूर यांनी केलं आहे. पावसानं व पुरानं केरळमध्ये 200 पेक्षा जास्त बळी घेतले असून सात लाकांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. केंद्रासह अनेक राज्यांनी केरळला मदतीचा हात पुढे केला आहे.