प्लुटोचे ग्रहपद रद्द होऊन त्याला बटुग्रह घोषित केल्यानंतर आपल्या सौरमालेत आता आठच ग्रह राहिले आहेत, पण जर सौरमालेत नेपच्यूनच्या पलीकडे एखादा ग्रह असेल तर तो आपल्या सूर्याने दुसऱ्या एखाद्या ताऱ्यापासून पळवला असावा व ही घटना ४.५ अब्ज वर्षांंपूर्वी घडली असावी. सैद्धांतिक पातळीवरील हा ग्रह खरोखर असेल तर तो सौरमालेतील पहिला बाह्य़ग्रह असेल असा दावा खगोलवैज्ञानिकांनी केला आहे, सौरमालेबाहेरील ग्रह म्हणजे बाह्य़ग्रह असतो. स्वीडनमधील ल्यूंड विद्यापीठातील खगोलवैज्ञानिकांनी म्हटले आहे की, नववा ग्रह असण्याची शक्यता जास्त आहे व तो आपल्या सूर्याने पळवलेला असावा व तेव्हापासून तो आपल्या सौरमालेत अज्ञातावस्थेत असावा. आपले खगोलवैज्ञानिक शेकडो प्रकाशवर्षे दूर असलेले अनेक बाह्य़ग्रह इतर सौरमालात शोधत आहेत, पण त्यातील एक ग्रह अगदी आपल्या परसदारी असण्याची शक्यता आहे असे मत ल्यूंड विद्यापीठातील अलेक्झांडर मस्टील यांनी व्यक्त केले आहे. तारे हे तारकागुच्छात जन्मतात व त्यावेळी ते एकमेकांभोवती फिरता फिरता एकमेकांच्या कक्षेत फिरणारे ग्रह पळवू शकतात. तसेत आपल्या सूर्याने नववा ग्रह पळवलेला आहे. संगणकीकृत सादृश्यीकरणात ग्रह ९ हा सूर्याने जवळच्या ताऱ्याभोवती फिरत असताना पळवला असावा अशी शक्यता वर्तवली गेली आहे. यात सूर्य दुसऱ्या ताऱ्याच्या खूप जवळ आला असावा. नववा ग्रह मोठा असावा त्यामुळे तो कक्षेतून सुटून सूर्याच्या कक्षेत आला असावा व सूर्याने ती संधी साधून मूळ ताऱ्यापासून तो घेतला असावा, असे मस्टील यांनी म्हटले आहे. जेव्हा सूर्य हा तारकासमूहातून जन्मल्यानंतर निघाला तेव्हा नववा ग्रह त्याच्या कक्षेत चिकटून आला असावा. या ग्रहाचे अजून प्रकाशाच्या बिंदूइतकेही छायाचित्र नाही. आपल्याला तो खडकाळ, बर्फाचा की वायूचा आहे हे माहिती नाही. एवढेच माहिती आहे की, तो पृथ्वीच्या दहापट मोठा आहे. यावर खूप संशोधनाची गरज आहे. तो कदाचित आपल्या सौरमालेतील पहिला बाह्य़ग्रह असावा. जर सिद्धांत खरा असेल तर मस्टील यांच्या मते सूर्य व पृथ्वी यांचे आकलन बदलेल. हा बाह्य़ग्रह असा असेल जेथे आपण अवकाशयानाच्या माध्यमातून पोहोचू शकू असे त्यांचे म्हणणे आहे.