ऐन पर्यटनासाठी पुरक असणाऱ्या दिवसांमध्येच केरळमध्ये निपा व्हायरस झपाट्याने परसरत असल्यामुळे या साऱ्याचे परिणाम थेट इथल्या पर्यटन क्षेत्रावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, मुळात इथल्या स्थानिाकांनी मात्र व्हायरसविषयीच्या चर्चा काही चुकीच्या असून त्याविषयीची चुकीची माहिती सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून दिली जात असल्याचं मत मांडलं आहे.

केरळमधील कोझिकोडे इथे या व्हायरसची पहिली लागण झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर त्यामुळे जवळपास १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या व्हायरसवर कोणताही उपचार उपलब्ध नसल्यामुळे सध्या कोझिकोडे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पण, या सर्व चर्चा आणि वातावरणाचा फटका केरळच्या पर्यटनावर होत असून, ऐन मोसमातच पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

वाचा : निपाह व्हायरस : नर्स लिनी पुथूसेरी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर

सध्याच्या घडीला उत्तर भारतामध्ये पर्यटकांचा ओघ जास्त आहे. ज्यामुळे तेथील स्थानिक हे केरळात येऊन सुट्टीचा आनंद घेण्यास प्राधान्य देतात. पण, निपा व्हायरसच्या भीतीमुळे मात्र जवळपास ५० ते ६० टक्के पर्यटकांनी केरळात येण्याचा त्यांचा बेत रद्द केला आहे. आखाती राष्ट्रांकडूनही काही पर्यटकांचा ओघ केरळकडे पाहायला मिळत आहे. पण, त्यातही निपा व्हायरसमुळे द्विधा अवस्थाच जास्त असल्याचं लक्षात येत आहे, असं टुरिझम प्रोफेशन क्लबचे सचिव पॉल यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

निपा व्हायरसमुळे केरळमधील कोझिकोडे या ठिकाणासोबतच इतरही बऱ्याच ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पर्यटकंमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही पर्यटकांनी पुढच्या महिन्यातील बुकिंगसुद्धा रद्द केले आहेत. ज्यामुळे पर्यटनावर उदरनिवर्वाह चालणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत निपा व्हायरसची दहशत संपूर्ण केरळमध्ये पाहायला मिळत आहे. इथल्या वैद्यकिय विभागातर्फे पर्यटकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यत्वे कोझिकोडे, मलाप्पुरम, वायनाड आणि कन्नूर या भागांमध्ये निपा व्हायरसिषयी जास्त सावधगिरी बाळगण्यात येत आहे.