केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाहच्या विषाणू संसर्गामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परिचारीकेचाही समावेश होता. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जम्मू-कश्मीर, गोवा, राजस्थान, गुजरात आणि तेलंगाणा या राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा आजार वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे खाल्ल्याने तसेच इतर काही कारणांमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असताना हिमाचल प्रदेशात डझनभर वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हिमाचलमध्ये या आजाराचा एकही रुग्ण सापडला नसताना ही वटवाघळे अचानक कशी गेली याबाबात सर्वांनाच प्रश्न पडला आहे.

हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील बर्मापापडी सीनिअर सेकंडरी शाळेच्या मैदानामधील एका झाडावर अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वटवाघळांचे वास्तव्य आहे. मात्र अचानक या वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अशी घटना एकदाही घडली नसताना अचानक हे कसे झाले असा प्रश्न येथील स्थानिक आणि प्रशासनाला पडला आहे. या विषाणूची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच त्यांचा मृत्यू होणे ही बाब काहीसा चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, या वटवाघळांच्या मृत्यूमुळे हिमाचल प्रदेशातही निपाहचे सावट पसरेल अशी भिती येथील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. मात्र, या मृत वटवाघळांमुळे कोणत्याही विषाणूची लागण होणार नसल्याचा खुलासा वनविभागाचे ललित जैन यांनी केला. पुढे ते म्हणाले, कदाचित या वटवाघळांचा मृत्यू उष्णतेमुळे झाला असेल. या मृत वटवाघळांचे शव पशुपालन विभागाकडून जालंधर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या मृत वटवाघळांची चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले असून लवकरच त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल.