पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या कंपनीने अमेरिकेत दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, आता नवी माहिती समोर आली आहे. दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज करुनही आपल्या कर्मचा-यांना बोनस देण्याची नीरव मोदीची इच्छा आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकी ट्रस्टी विल्यम के यांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

नीरव मोदीच्या डायमंड इंक, ए जेफ आणि सिनर्जिस कॉर्पोरेशन या कंपन्यांनी न्यूयॉर्कच्या कोर्टात दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यानंतरही त्यांना आपल्या कर्मचा-यांना जवळपास २३ हजार युएस डॉलरचा बोनस द्यायचा आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. नीरव मोदींची कंपनी दिवाळखोर घोषित करण्याच्या प्रक्रियेतून जात आहे हे कोर्टाला माहितीये. याशिवाय नीरव मोदी भारतातही एका बॅंक घोटाळ्यामध्ये अडकला आहे, अशा परिस्थितीत बोनसबाबत बोलणं चुकीचं आहे असं विल्यम यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे.

याशिवाय ज्याप्रकारे नीरव मोदीच्या कंपनीने आपल्या कर्मचा-यांबद्दल माहिती दिली आहे, त्यावर देखील आक्षेप ठेवण्यात आला आहे. कंपनीकडून कर्मचा-यांचं नाव, जॉब प्रोफाइल आणि अन्य माहिती लपवण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी २ मे रोजी होणार आहे.