लंडन : पंजाब नॅशनल बँकेला दोन अब्ज डॉलर्सना गंडा घालणारा हिरेव्यापारी नीरव मोदी याने जामिनासाठी शुक्रवारी ब्रिटन उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे.  ब्रिटिश न्यायालयाने त्याची कोठडी २७ जूनपर्यंत वाढवल्यानंतर त्याने एक दिवसानंतर हा अर्ज सादर केला आहे.

ब्रिटनच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सव्‍‌र्हिसेसच्या वतीने भारत सरकारची बाजू मांडली जात असून नीरव मोदी याला भारताच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मोदी याने दाखल केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी ११ जूनला लंडन येथे रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टीस येथे होणार आहे. लंडनच्या वेस्टमिनस्टर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला यापूर्वी तीनदा जामीन नाकारला आहे. नीरव मोदी शरणागती न पत्करण्याची शक्यता असून जामीन हमीही कमी आहे. हा मोठा घोटाळा असून जामीन हमी दुप्पट म्हणजे २० लाख पौंड करूनही ती पुरेशी नाही, असे मुख्य दंडाधिकारी एम्मा अर्बुथनॉट यांनी ८ मे रोजी जामीन अर्जाची सुनावणी करताना सांगितले होते. तीनदा अपील केल्यानंतर आता नीरव मोदी याला उच्च न्यायालयात अपिलाचा अधिकार प्राप्त झाला होता. प्रवक्तयाने सांगितले, की तिसऱ्यांदा अर्ज फेटाळला गेल्याने आता नीरव मोदी याला अपिलाचा अधिकार प्राप्त झाला आहे. नीरव मोदी लगेच अपील करू शकतो किंवा काही ठोस कागदपत्रे घेऊन नंतरही तो अपील करू शकतो. मोदी याच्या कायदा सल्लागार चमूने सांगितले, की त्याचा व्ॉडस्वर्थ तुरुंगातील अनुभव हा वाईट असून तेथे खूप वाईट अवस्था आहे. त्यामुळे त्याला खटल्यासाठी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे.