लंडन : पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे २ अब्ज अमेरिकी डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी हा शरण येण्याबाबत शंका असल्याचे सांगून ब्रिटनमधील एका न्यायालयाने बुधवारी त्याला तिसऱ्यांदा जामीन नाकारला.

बुधवारी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील मुख्य मॅजिस्ट्रेट एम्मा आर्बुथनॉट यांच्या न्यायालयात नीरव मोदी हजर झाला.

त्याच्या वकिलांनी जामिनाच्या हमीची रक्कम २ अब्ज पौंडापर्यंत वाढवली आणि तो त्याच्या लंडनमधील फ्लॅटमध्ये २४ तास बद्ध राहील असे सांगितले. वँड्सवर्थ तुरुंगातील वातावरण राहण्यासारखे नसून, तुम्ही घालाल त्या अटींचे आपला अशील पालन करेल, असे मोदी याचे वकील क्लेअर माँटगोमेरी यांनी न्यायाधीशांना सांगितले. मात्र त्यामुळे न्यायाधीशांचे समाधान झाले नाही.

हा फार मोठा घोटाळा असून, हमीची रक्कम २ अब्ज पौंडांपर्यंत वाढवण्यामुळे, (जामीन मंजूर केल्यास) नीरव मोदी शरण येणार नाही या चिंतेचे निराकरण होत नाही, असे न्यायाधीश म्हणाल्या व त्यांनी तिसऱ्यांदा त्याला जामीन देणे नाकारले.