पंजाब नॅशनल बँकेला १ अब्ज डॉलर्सना गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटनमधील न्यायालयाने २४ मे पर्यंत कोठडी दिली असून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मोदी याने त्याला भारताच्या ताब्यात देऊ नये यासाठी याचिका दाखल केली असून त्याने तुरुंगातून व्हिडिओ जोडणीच्या माध्यमातून वेस्टमिनस्टर दंडाधिकारी तुरुंगात मुख्य दंडाधिकारी एम्मा अर्बुथनॉट यांच्यासमोर हजेरी लावली. ४८ वर्षांच्या मोदी याला गेल्या महिन्यात अटक केल्यानंतर लंडनमधील वँडस्वर्थ तुरुंगात ठेवले आहे.

अर्बुथनॉट यांनी सांगितले, की नीरव मोदी तुम्हाला २४ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात येत आहे, त्या वेळी आणखी सुनावणी घेतली जाईल व नंतर ३० मे रोजी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर हजर करून पूर्ण सुनावणी घेतली जाईल.

त्यानंतर अर्बुथनॉट यांनी बॅरिस्टर जेसिका जोन्स यांना आणखी काही मुद्दे विचारार्थ आहेत का, अशी विचारणा केली असता त्यांनी नाही असे उत्तर दिले, याचा अर्थ मोदी याच्या वतीने न्यायालयासमोर पुन्हा जामीन अर्ज दाखल केलेला नाही. २४ मे रोजी होणारी सुनावणी पुन्हा प्रक्रियात्मक असणार असून त्यात २८ दिवस न्यायालयीन कोठडीची अट पूर्ण होणार आहे. ३० मे रोजी मोदी याला व्यक्तिगत पातळीवर हजर केले जाणार असून त्या वेळी पूर्ण सुनावणी होईल. भारताच्या बाजूने युक्तिवाद केला त्यात बॅरिस्टर निलोफर बावला यांनी बाजू मांडली.  वेगळ्या अटीवर नीरव मोदी याला शुक्रवारी तिसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल करता आला असता पण त्याने तसे केले नाही. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारला आहे.