पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदी याने अनेक पारपत्रे (पासपोर्ट) वापरल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नव्याने एफआयआर दाखल केला जाण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मोदीने किमान सहा पारपत्रे वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोदीने एकावेळी किमान सहा भारतीय पारपत्रे बाळगली होती. त्याच्या जोरावर तो अनेक देशांत फिरत होता. त्याच्या प्रवासाच्या नोंदी तपासल्या असता असे लक्षात आले की, सहापैकी चार पारपत्रे सध्या वापरात नाहीत. मात्र दोन पारपत्रांच्या आधारे त्याचा विविध विमानतळ आणि बंदरांमार्गे प्रवास होत होता. पीएनबी घोटाळ्यानंतर भारतीय तपास अधिकाऱ्यांनी त्याची उरलेली दोन पारपत्रे रद्द केली. त्यापैकी एकावर त्याचे पूर्ण नाव आहे, तर दुसऱ्यावर केवळ पहिले नाव आहे. दुसऱ्या पारपत्रावर ४० महिन्यांचा ब्रिटनचा व्हिसाही होता.

एकावेळी अनेक पारपत्रे बाळगणे आणि रद्द केलेल्या पारपत्रावर प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. केवळ काही प्रकरणांत राजनैतिक आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यातून मुभा देण्यात येते. या गुन्ह्य़ाबद्दल मोदीविरोधात नव्याने एफआयआर दाखल करण्याचा विचार केला जात आहे.