पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीचा कालवधी आता १९ सप्टेंबर पर्यंत करण्यात आला आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाच्या न्यायाधीशांनी व्हिडीओद्वारे याप्रकरणी सुनावणी करत निर्णय दिला.

नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून तो भारताला हवा आहे. त्याला मार्चा मध्ये लंडन येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वाँड्सवर्थ तुरूंगात आहे. तेथील कायद्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यानंतर ताब्यातील कालावधी वाढवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले जात आहे.

या अगोद मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी असे संकेत दिले होते की, दोन्ही पक्ष त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्तावित पाच दिवसांच्या सुनावणीवर लवकरच राजी होऊ शकतात. ही सुनावणी देखील व्हिडीओद्वारे झाली होती. न्यायलयाकडून या अगोदर अनेकवेळा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. मागील महिन्याच लंडनमधील उच्च न्यायालयाने देखील त्याचा जामीन फेटाळला होता. हा त्याचा चौथा जामीन अर्ज होता. उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतरची नीरव मोदीची ही दुसरी सुनावणी आहे.