बँकेच्या अंतर्गत चौकशी अहवालातून पुढे आलेला निष्कर्ष

हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या फसवणुकीमुळे उजेडात आलेल्या १४,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उगम मुळात मुंबईतील शाखेत झाला नसून बँकेच्या दिल्ली तसेच आंतरराष्ट्रीय शाखेत नजरेआड झालेल्या प्रक्रियांमुळे झाला असल्याचा निष्कर्ष पंजाब नॅशनल बँकेच्या अंतर्गत तपास अहवालातून पुढे आला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या ई-मेल आणि अन्य प्रणालींचा बाहेरच्या व्यक्तींनी गैरवापर करून हा घोटाळा घडवून आणला, असेही नमूद करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये हे घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँकेने अंतर्गत चौकशी सुरू केली होती. बँकेच्या ब्रॅडी हाऊस या दक्षिण मुंबईतील शाखेतून हे प्रकरण समोर आले होते. यानंतर बँकेने आजवर ५४ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईही केली आहे.

याबाबत तयार करण्यात आलेल्या जवळपास २०० पानी तपास अहवालात, बँकेचे ई-मेल, महत्त्वाची कर्जविषयक कागदपत्रे, हमीपत्रे यांचा वापर करून बँकेच्या शाखेबाहेर संबंधितांनी गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात यामध्ये काही कर्मचाऱ्यांनी संगनमतातून सहभाग केल्याचीही कबुली या अहवालाद्वारे देण्यात आली आहे.

या घोटाळ्याचे आरोपी नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे प्रकरण उजेडात येण्याआधीच विदेशात फरार झाले आहे.