पीएनबी बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून पळालेला नीरव मोदी याच्या बाबत एक बातमी समोर आली आहे. नीरव मोदीमुळे एका कॅनडा स्थित माणसाचा साखरपुडा मोडला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या या माणसाने २ लाख यूएस डॉलर्स एवढी भली मोठी किंमत देऊन नीरव मोदीकडून हिऱ्याच्या दोन अंगठ्या खरेदी केल्या. आपल्या गर्लफ्रेंडला खऱ्या हिऱ्याची अंगठी साखरपुड्याच्या दिवशी भेट द्यायची असे त्याने ठरवले होते. मात्र त्याचे हे स्वप्न भंगले कारण नीरव मोदीने त्याला विकलेल्या या दोन्ही अंगठ्या बनावट निघाल्या.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार पॉल अलफॉन्सो नावाच्या माणसाने नीरव मोदी कडून २ लाख यूएस डॉलर्स एवढी तगडी किंमत देऊन हिऱ्याच्या दोन अंगठ्या विकत घेतल्या होत्या. पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने १३ हजार कोटींचा चुना लावला आहे याची सूतराम कल्पना पॉलला नव्हती. हिऱ्याच्या अंगठ्या घेऊन तो त्याच्या साखरपुड्याच्या सोहळ्यालाही पोहचला. मात्र या अंगठ्या बनावट निघाल्याने सगळ्याच कार्यक्रमावर विरजण पडलं.

हाँगकाँग येथील बेव्हरली हिल्स या हॉटेलमध्ये पॉल आणि नीरव मोदी या दोघांची भेट २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघे काही महिन्यांनी पुन्हा एकदा भेटले. पॉल हा एका बड्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो. या दोघांचा संपर्क होता. त्यानंतर काही वर्षे गेली. या वर्षातील एप्रिल महिन्यात पॉलने नीरव मोदीला आपल्या आपल्या साखरपुड्यासाठी दोन अंगठ्या हव्या असल्याचे सांगितले. नीरव मोदी हा भारतातून किती मोठा घोटाळा करून पळाला आहे याची थोडीशी कल्पना पॉलला नव्हती. आपल्याला गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आपल्याला हिऱ्याची अंगठी हवी आहे असे नीरव मोदीला पॉलने सांगितले. ज्यानंतर २ लाख यूएस डॉलर्स एवढे मूल्य असलेल्या दोन अंगठ्या नीरव मोदीने पॉलला विकल्या. ज्या बनावट असल्याचे समोर आल्याने या माणसाला धक्का बसला आहे. एवढंच नाही तर त्याचा साखरपुडाही मोडला आहे.

पॉलने आपली फसवणूक झाल्याची तक्रार कॅलिफोर्नियाच्या कोर्टात नोंदवली आहे. तसेच नीरव मोदी भारतातील बँकांना १३ हजार कोटींचा चुना लावून पळाला आहे हे वाचल्यानंतर पॉलला धक्काच बसला. तुला काही कल्पना आहे का? तू काय केले आहेस? तुझ्यामुळे माझा साखरपुडा मोडला. मला आणि माझ्या एक्स गर्लफ्रेंडला या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला. असा इमेल पॉलने नीरव मोदीला पाठवला आहे. तसेच नीरव मोदीने आपल्याला ४ लाख डॉलर्सची भरपाई द्यावी असेही पॉलने म्हटलं आहे.