पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी नीरव मोदीची २,३४८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

मुंबईच्या वरळी भागातील ‘समुद्र महाल’ इमारतीमधील फ्लॅट, अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरील फार्म हाऊस, राजस्थानमधील जैसलमेरमधील मॉल, लंडन-यूएईमधील फ्लॅट्स ताज्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले आहेत.

आठ जूनला मुंबईतील विशेष न्यायालयाने ईडीला संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली होती. मागच्यावर्षी पाच डिसेंबरला याच कोर्टाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.

यापूर्वी २ हजार ३०० किलोपेक्षा अधिक सोनं भारतात आणलं
मागच्या महिन्यात सक्तवसुली संचलनालयानं नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीशी संबंधित कंपन्यांमधील तब्बल २ हजार ३०० किलोपेक्षा अधिक सोनं भारतात आणलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याची किंमत १ हजार ३५० कोटी रूपयांच्या जवळपास आहे. यामध्ये पॉलिश्ड डायमंड, पर्ल आणि सिल्व्हर ज्वेलरीचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. हे सर्व हाँगकाँगमधील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात ठेवण्यात आली होती. मुंबईमध्ये आलेल्या १०८ कंसायमेंट्सपैकी ३२ हे नीरव मोदीद्वारे चालवण्यात येणाऱ्या कंपन्यांचे आहेत. तर उर्वरित हे मेहुल चोक्सीच्या कंपनीचे आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कंसायमेंट्स आता पीएमएलए अंतर्गत अधिकृतरित्या जप्त करण्यात येणार आहे. तसंच ईडीनं हाँगकाँगमधील सर्व कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर ही ज्वेलरी भारतात आणण्यात आली आहे.

यापूर्वीही सक्तवसूली संचलनालयानं दुबई आणि हाँगकाँगमधून ३३ कंसायमेंट्स भारतात आणले होते. तेदेखील नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या कंपन्यांचेच होते. ते कंसायमेंट्स आल्यानंतर त्याचं मूल्यांकन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते जप्त करण्यात आलं. स्वतंत्र मूल्यांकन करणाऱ्यानं त्याची किंमत १३७ कोटी रूपये असल्याचं म्हटलं होतं.