निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख निश्चित झाल्यानंतर या प्रकरणात आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. दोषी मुकेशकुमार सिंह याने आपल्या पूर्वीच्या वकिलांवर आरोप करीत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यास तीन वर्षांचा कालावधी असतो याची माहिती आपल्याला जुन्या वकिलांनी दिली नाही असं त्यानं याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे याबाबतच्या सर्व कारवाया रद्द करुन पुन्हा क्युरेटिव्ह याचिका आणि इतर कायदेशीर पर्याय वापरण्याची परवानगी देण्यात यावी, असेही त्याने याचिकेत म्हटले आहे. वकील एम. एल. शर्मा यांच्यामार्फत मुकेशने कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

नव्या याचिकेत मुकेशनं भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमिकस क्युरी (कोर्ट सहाय्यक) यांना प्रतिवादी केलं आहे. त्यानं याचिकेत म्हटलं की, मला एका कटाचा बळी बनवण्यात आलं आहे. लिमिटेशन अॅक्टनुसार क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा काळ असतो, हे आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे मला माझ्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं आहे.

लिमिटेशन अॅक्टच्या कलम १३७ नुसार याचिका दाखल करण्याची कालमर्यादा निश्चित आहे. यासाठी तीन वर्षांपर्यंतचा काळ असतो. त्यामुळे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी मिळू शकतो. त्यामुळे मुकेशची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी वेळ होता. जो जुलै २०२१ पर्यंत आहे. मात्र, कोर्ट सहाय्यकाने जबरदस्तीने प्रतिज्ञापत्रावर आपल्या सह्या घेतल्या आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल केली, असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

याचिकेत वकिलांनी म्हटलं की, “जिथं मर्यादा निश्चित नसते तिथं तीन वर्षांचा कालावधी दिला जातो. या प्रकरणी एमिकल क्युरींनी मुकेशचे सर्वच कायदेशीर पर्याय संपवले त्यामुळे तो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तसेच ६ डिसेंबर २०१९ ते ३ मार्च २०२० दरम्यानचे सर्व कोर्ट आदेश रद्द व्हायला हवेत. तसेच मुकेशला पुन्हा सर्व कायदेशीर पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. तसेच क्युरेटिव्ह याचिका आणि इतर अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी.”

२० मार्चला होणार दोषींना फाशी

दरम्यान, दिल्लीतील कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींच्या नावे २० मार्च रोजीचे डेथ वॉरंट काढले आहे. त्यामुळे २० मार्च रोजी चारही दोषींना पहाटे साडे पाच वाजता फाशी दिली जाणार आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया देताना “२० मार्च रोजी माझ्या जीवनाची सकाळ होईल” असे म्हटले होते.