२०१२ च्या डिसेंबर महिन्यात निर्भयावर चालत्या बसमध्ये झालेल्या बलात्काराने दिल्ली हादरली. निर्भयावर बलात्कारच करण्यात आला नाही तर त्यानंतरही तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याच प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ मार्च रोजी त्यांना फाशी देण्यात येणार आहे. मात्र या प्रकरणातील दोषी पवनकुमार गुप्ता याने फाशीच्या शिक्षेत बदल करुन आपल्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. पवन गुप्ताचे वकील ए. पी. सिंह यांनी ही माहिती दिली.

तिसऱ्यांदा बदललं डेथ वॉरंट

निर्भया बलात्कार प्रकरणात २२ जानेवारीचं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होतं. २२ जानेवारी २०२० ला या चौघांना फाशी देण्याची तारीख ठरली. मात्र ती पुढे ढकलण्यात आली.

या तारखेनंतर १ फेब्रुवारीचं डेथ वॉरंट आलं. मात्र ही तारीखही पुढे ढकलण्यात आली. १ फेब्रुवारीची तारीख पुढे ढकलली गेल्यानंतर आजवर, म्हणजेच मागच्या १६ दिवसात काहीही निर्णय आला नव्हता.

आता तिसऱ्यांदा ही तारीख समोर आली आहे. नव्या डेथ वॉरंटनुसार ३ मार्च रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशी देण्यात येईल असं कोर्टाने म्हटलं आहे.