सात वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरतेय. आता आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं असून निर्भयाच्या दोषींना एखाद्या महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

वर्तिका सिंहने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिलंय. “निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी दिली गेली पाहिजे. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेशा संपूर्ण देशभरात जाईल. महिला कलाकार आणि खासदारांनी माझं समर्थन करावं, यामुळे समाजात बदल घडेल अशी अपेक्षा आहे”, अशा आशयाचं पत्र वर्तिकाने लिहिलंय.

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला धावत्या बसमध्ये झालेल्या निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार केले होते. या पाशवी अत्याचारानंतर अकरा दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर 29 डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. एका दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणातील फाशीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.