नवी दिल्ली : दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील चार दोषींपैकी एकाची दुसरी दया याचिका अद्याप प्रलंबित असल्यामुळे या चौघांच्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यासाठी या चौघांच्या वकिलाने बुधवारी येथील न्यायालयात धाव घेतली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी या याचिकेवर तिहार कारागृहाचे अधिकारी व पोलीस यांना नोटिसा जारी करतानाच, आपण याचिकेची उद्या, गुरुवारी सुनावणी करू असे सांगितले.

दोषी अक्षय सिंह याने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दुसरी दया याचिका केली. याच दिवशी, पवन गुप्ता या दुसऱ्या दोषीनेही आपला अल्पवयीन असल्याचा दावा नाकारणाऱ्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका केली.

मुकेश सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांना २० मार्चला, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत.

मुकेश सिंहच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाचा निकाल राखून

नवी दिल्ली : १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खुनाचा गुन्हा घडला, त्या दिवशी आपण राष्ट्रीय राजधानीत नव्हतो हा या गुन्ह्य़ात दोषी मुकेश सिंह याचा दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर; या निर्णयाला आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवरील आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.दोषी मुकेश सिंह आणि दिल्ली सरकार या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. ब्रिजेश सेठी यांनी आदेश राखीव ठेवला.कनिष्ठ न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळून लावली होती आणि त्याच्या वकिलांना योग्य ती समज द्यावी, असे बार कौन्सिल ऑफ इंडियाला सांगितले होते.

दोषीच्या पत्नीची न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका

औरंगाबाद (बिहार) आपल्याला ‘बलात्काऱ्याची विधवा पत्नी’ असा शिक्का घेऊन जगायचे नसल्याचे सांगून, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका दोषीच्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका केली आहे.

या आठवडय़ाअखेरीस फाशीवर जाणार असलेला अक्षय ठाकूर हा मध्य बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या नबीनगर खंडाचा रहिवासी आहे. त्याची पत्नी पुनिता देवी हिने मंगळवारी कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पतीवर लैंगिक गुन्ह्य़ाचा आरोप ठेवण्यात आला असल्याच्या आधारावर कुठलीही महिला घटस्फोट मागू शकते, अशी कायद्यात तरतूद असल्याचे पुनिताचे वकील मुकेश कुमार सिंह यांनी सांगितले.

आपला पती ‘निष्पाप’ असून, त्याला या निंदनीय गुन्ह्य़ात चुकीने गोवण्यात आले आहे, अशी भूमिका अक्षय ठाकूरच्या पत्नीने आतापर्यंत घेतली होती. त्यामुळे, ही याचिका म्हणजे २० मार्चला ठरलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा आणखी एक डाव असू शकतो, असे तर्कवितर्क केले जात आहेत.