News Flash

निर्भया प्रकरण: …जाब विचारणाऱ्या ‘त्या’ संतप्त तरूणींना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिंदे म्हणाले,…

एका पत्रकारानं पेटलेल्या आंदोलनादरम्यानचा सांगितलेला किस्सा

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

हाथरस प्रकरणानं देश ढवळून निघाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या क्रूर घटनेवर संताप व्यक्त होत आहे. सगळीकडून पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे हाथरसच्या घटनेनं दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून दिली आहे. निर्भयाच्या प्रकरणानंतरही अशीच लाट उसळून आली होती. देशभरात पेटलेल्या आंदोलनादरम्यान तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यांच्याकडे उत्तर मागण्यासाठी पाच-सहा कॉलेज तरुणी गेल्या होत्या. त्यांना शिंदे यांनी दिलेल्या उत्तराचा हा किस्सा…

देशभरात सध्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची चर्चा सुरू आहे. अशीच एक घटना दिल्लीत २०१२मध्ये घडली होती. दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं. प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. क्रूरपणाचा कळस म्हणजे तिचा अमानुष लैंगिक छळही करण्यात आला. यानंतर विवस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं.

 

दिल्लीतील या घटनेनं देश पेटून उठला. देशभरात आंदोलनांची लाट उसळली. सगळीकडे संताप व्यक्त होऊ लागला. दिल्ली या आंदोलनांचं केंद्र बनलं. निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात आंदोलन सुरू होतं. इंडिया गेटपासून ते साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक पर्यंत घोषणाबाजी सुरू होती. प्रचंड मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. आंदोलक तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे जबाब मागत होते. हे आंदोलन सुरू असताना अचानक तिथे एक पोलीस अधिकारी आला. त्याने सांगितलं, ‘केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलू इच्छिणाऱ्या पाच-सहा जणांनी आपल्यासोबत यावं.’

त्यानंतर पाच सहा कॉलेज तरुणी पोलीस अधिकाऱ्यांसोबत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी गेल्या. त्यांची सुशीलकुमार शिंदे यांच्याशी भेट घालून दिली गेली. त्या पाच-सहा तरुणींनी दहा मिनिटापर्यंत शिंदे यांच्यासमोर आपला राग व्यक्त केला. शिंदे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.

त्यानंतर त्यांच्याशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले,”मला तीन मुली आहे आणि मी तुमचा राग आणि त्रास समजू शकतो. न्याय जरूर मिळेल आणि आम्हाला तुमच्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी आहे.” भेटीनंतर त्या तरुणी परत आल्या. दिल्लीतील पत्रकार पूनम पांडे यांनी हा किस्सा सांगितला आहे. हाथरस प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव केला जात असल्याच्या बाबीवर त्यांनी नाराजी व्यक्त करताना हा किस्सा ट्विट करून सांगितला आहे. निर्भया आंदोलनावेळी पांडे या त्या तरुणींच्या शिष्टमंडळासोबत शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 2:21 pm

Web Title: nirbhaya gangrape case delhi hathras gangrape case uttar pradesh sushilkumar shinde ex union home minister bmh 90
Next Stories
1 हाथरस : तृणमूलच्या नेत्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखलं; पोलिसांकडून धक्काबुकी
2 पाकिस्तानी लष्कराला कमकुवत करण्यासाठी नवाज शरीफांना भारताची मदत : इम्रान खान
3 नोटबंदीचा उद्देश अयशस्वी ?; आढळल्या २००० च्या सर्वाधिक बनावट नोटा
Just Now!
X