आज निर्भयाच्या गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळाली. या चारही नराधमांना दिल्ली हायकोर्टाने सुनावलेली फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. न्या. दीपक मिश्रा, न्या. भानुमती , न्या.अशोक भूषण यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. यावेळी न्या. भानुमती यांनी निर्णय देताना स्वामी विवेकानंदांचं वाक्य उध्दृत केलं.

“कोणत्याही देशाची किती प्रगती झाली आहे ते त्या देशामधल्या महिलांशी कशा प्रकारचा व्यवहार होतो यावरून दिसतं.” पुढे न्यायाधीश भानुमती यांनी लिहिलं की ‘स्त्रियांविरोधी होणारे अपऱाध फक्त त्या स्त्रियांच्या मानसन्मानाला धक्का पोचवत नाहीत तर त्या समाजाच्या सुरक्षेला आणि विकासालाही बाधा आणतात. समाजामध्ये महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मुलांना विशेष शिकवण देण्याची गरज आहे.”

न्यायमूर्ती भानुमती पुढे म्हणाल्या “मला आशा आहे की देशाच्या राजधानीत घडलेली ही घटना लैंगिक भेदभाव, महिलांना मिळणारी असमानतेची वागणूक आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांकडे सगळ्या समाजाचं लक्ष वेधणारी ठरेल”

भानुमती पुढे हेही म्हणाल्या की लैंगिक भेदभावविरोधी लैंगिक न्यायाची लढाई तेव्हाच जिंकली जाऊ शकेल जेव्हा समाज संवेदनशील बनेल, कायद्याच्या तरतुदींची योग्यप्रकारे अंमलबजावणी होईल आणि लैंगिक भेदभाव मिटवण्यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरांतून प्रयत्न होतील.

दरम्यान निर्भया प्रकरणात चारही दोषींना शिक्षा दिल्याचं देशाच्या राजकीय वर्तुळातून स्वागत होतंय. दोषींचे वकील सोडले तर बाकी सर्वजण या दोषींना दिल्या गेलेल्या शिक्षेचं स्वागत करत आहेत.

आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी या आरोपींना कठोर शिक्षा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. त्यांनी ट्वीट करत निर्भयाला झालेल्या बलात्काराबद्दल एक समाज म्हणून तिची माफी मागितली आहे.