निर्भया बलात्कार : लूटप्रकरणी १० वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या चार गुन्हेगारांना दिल्ली न्यायालयाने लूटप्रकरणी दहा वर्षांचा कारावास ठोठावला आहे. निर्भयावर या नराधमांनी बलात्कार केला त्या रात्री सुतारकाम करणारा राम आधार याला लुटले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी वेगळा गुन्हा नोंदविला होता. यावर बुधवारी दिल्ली अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रितेश सिंग यांनी निकाल देताना विनय शर्मा, अक्षय ठाकूर, मुकेश आणि पवन गुप्ता या चौघांना १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

उबरप्रकरणातील खटला मागे
न्यूयॉर्क : दिल्लीत गेल्या वर्षी उबर टॅक्सीचालकाने एका भारतीय महिलेवर टॅक्सीतच बलात्कार केला होता त्या खटल्यास आता आश्चर्यकारक कलाटणी मिळाली आहे. संकेतस्थळावर आधारित टॅक्सी कंपनीविरुद्ध सदर महिलेने अमेरिकेतील न्यायालयात दाखल केलेला खटला स्वेच्छेने मागे घेतला आहे. सदर महिलेच्या वकिलाने अमेरिकेतील न्यायालयात सांगितले की, महिलेने स्वेच्छेने खटला मागे घेण्याचे ठरविले आहे. खटल्यात भारतीय महिलेचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांत, खटला का मागे घेण्यात येत आहे आणि कोणत्या अटींनुसार ते नमूद करण्यात आलेले नाही. जानेवारी महिन्यात या महिलेने उबरविरुद्ध खटला दाखल केला होता. उबर कंपनीने आपल्याकडील चालकांची नीट माहिती घेतलेली नाही आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे आपले लैंगिक शोषण झाले, असा आरोप खटल्यात करण्यात आला होता. शिवकुमार यादव नावाच्या टॅक्सीचालकाने भारतीय महिलेवर बलात्कार केला होता.