केंद्र सरकारकडून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांच्या जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू (जेएनयू) आणि जाधवपूर विद्यापीठाला पहिल्या दहांमध्ये स्थान मिळाले आहे. मात्र, हे स्थान त्यांना अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे नव्हे तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे मिळाल्याचा टोला, केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हाणला. प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी देशातील सर्वोत्तम उच्च शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी म्हटले की, जेएनयू आणि जाधवपूर विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना क्रमवारीत वरचे स्थान मिळाले आहे. अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल किंवा कुलगुरूंना घेराव घातल्यामुळे त्यांना हे स्थान मिळालेले नाही, असे जावडेकर यांनी म्हटले.

दरम्यान, नॅशनल इन्सिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) यादीत स्थान मिळालेल्या विद्यापीठांना अनुदान, स्वायत्तता आणि अनेक सुविधा मिळणार आहेत. या सगळ्यातून स्पर्धेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी लवकरच यासंदर्भातील धोरण जाहीर केले जाईल. यामागे देशातील शैक्षणिक संस्थांनी अधिकाअधिक चांगली कामगिरी करावी, असा हेतू आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अधिक निधी दिला जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.

अध्यापनाचा दर्जा , शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, शिक्षणाचा दृष्टीकोन, विद्यार्थ्यांशी संवाद व सर्वसमावेशकता आणि उत्पादक संशोधन या निकषांच्या आधारे नॅक समितीकडून या शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यंदा ८०० नव्या शैक्षणिक संस्थांनी या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून यंदा वैद्यकशास्त्र आणि विधी शाखेच्या सर्वोत्तम महाविद्यालयांचीही यादी जाहीर करण्यात आली.

दरम्यान, येत्या जुलै महिन्यापासून विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी ‘नॅक’ समितीकडून नवीन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन मूल्यांकन आयसीटी (इन्फोम्रेशन कम्युनिकेशन  टेक्नॉलॉजी)च्या आधारावर होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यप्रणालीनुसार मूल्यांकन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठविणे अनिवार्य राहणार असून त्यानंतर महाविद्यालय व विद्यापीठांना नवीन कार्यप्रणालीनुसार ‘नॅक’ समितीला सामोरे जावे लागणार आहे. यासंदर्भात ‘नॅक’चे संचालक डी.पी. सिंग यांनी नुकतीच सूचना जारी केली होती.