मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान शुक्रवारी सभागृहात राफेल विमानांच्या करारावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली. राफेल विमानांच्या करारातील गुप्ततेच्या अटीबाबत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन खोटं बोलत आहेत, मोदी सरकारने राफेल विमानांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर सीतारामन यांना आरोपांना उत्तर देण्याची संधी देण्यात आली.

काय म्हणाल्या सीतारामन –

राफेल विमानांबाबत तपशील जाहीर करायचा नाही असा फ्रान्स व भारत यांच्यातील करार आहे. तो करार काँग्रेसच्याच काळात म्हणजे २५ जानेवारी २००८ रोजी झाला असून, त्याच करारानुसार आम्ही काम केले आहे. या करारावर तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची स्वाक्षरी आहे. सीतारामन यांनी या कराराची झेरॉक्स प्रतच सभागृहात दाखवली.

काय आहे राहुल गांधींचा आरोप –
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात असे सांगितले की, मी फ्रान्सच्या अध्यक्षांना दिल्लीत भेटलो होतो व त्यांनी दोन्ही देशांत राफेलबाबत कुठलाही गुप्तता करार नाही, असा खुलासा केला होता. मोदी सरकारने विमानांची किंमत वाढवल्याचा आरोप करताना राहुल यांनी असे सांगितले की, राफेल करारात एका विमानाची किंमत काँग्रेसच्या काळात ५२० कोटी रुपये ठरली होती. नंतर कुणाशी चर्चा झाली माहीत नाही, पण पंतप्रधान फ्रान्सला जाऊन आल्यानंतर विमानाची किंमत १६०० कोटी झाली असा आरोप केला होता.