संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचे टीकास्त्र

दहा वर्षे घालवूनही राफेल लढाऊ जेट विमानांच्या खरेदीबाबत निर्णय न घेतल्याबद्दल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या विलंबामुळे काय झाले, हे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्दय़ामुळे आपण सांगू शकत नाही असे त्या म्हणाल्या.

यूपीए सरकारच्या कार्यकाळात २००४ ते २०१३ या कालावधीत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या मुद्दय़ावर काही निर्णय घेण्यात आला नाही. या अनिर्णयामुळे बरेच नुकसान झाले, मात्र यात देशाच्या सुरक्षेचा मुद्दा गुंतलेला असल्यामुळे आपण त्याविषयी सविस्तर सांगू शकत नाही. यूपीए सरकारने ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे भाजपच्या नेतृत्वातील सरकारने संरक्षणविषयक गरज आणि तातडी लक्षात घेऊन खरेदीच्या सौद्याला मूर्त रूप दिले, असे सीतारामन म्हणाल्या.

२०१४ साली रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुदलाशी केलेल्या चर्चेनंतर ३६ राफेल विमाने उडण्यास तयार असलेल्या स्थितीत लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी दोन सरकारांमध्ये चर्चेचा मार्ग निवडण्यात आला. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची मंजुरी घेण्यासह सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

काँग्रेस हा मुद्दा आता का उपस्थित करीत आहे असे विचारले असता, हे सरकार कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय काम करीत आहे हे काँग्रेसचे खरे दुखणे आहे. अस्तित्वात नसलेल्या भ्रष्टाचाराचा शोध घेत काँग्रेसने या सौद्याबाबत प्रश्न मांडले आहेत, असा आरोप सीतारामन यांनी केला.

या सौद्यावर आक्षेप घेणे ‘लज्जास्पद’ असल्याचे निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दिल्लीत म्हटले होते. त्यावर, तुमचे नेते तुम्हाला ‘चूप करीत आहेत’ ही बाब लज्जास्पद नाही काय, असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना उद्देशून विचारला.

दरम्यान, ३६ राफेल विमानांच्या खरेदीमुळे भारताची संरक्षण व्यवस्था बळकट होणार असून भारत व फ्रान्स या दोन्ही देशांसाठी फायद्याची ठरणारी ही भागीदारी आहे, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन यवेस ली ड्रायन यांनी शनिवारी सांगितले.