केंद्रीय अर्थ मंत्रालयातून बदली करण्यात आल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेणारे माजी केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर गर्ग यांची अर्थ मंत्रालयातून ऊर्जा मंत्रालयात बदली करण्यात आली होती. स्वेच्छा निवृत्तीनंतर पहिल्यादाच मौन सोडत गर्ग यांनी सीतारामन यांच्यावर बदली केल्याचा आरोप केला आहे.

गर्ग यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सुभाष चंद्र गर्ग हे केंद्रीय अर्थ सचिव होते. मोदी सरकारच्या पहिल्या कालावधी अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे अर्थमंत्री पदाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली होती.

यासंर्दभात गर्ग यांनी म्हटलं आहे की, सीतारामन यांच्या मनात माझ्याबद्दल काही पूर्वग्रहित कल्पना असल्यानं त्यांच्याशी चांगले संबंध नव्हते. त्यांना माझ्यावर फारसा विश्वास नव्हता. त्याचबरोबर माझ्यासोबत काम करतानाही त्यांना व्यवस्थित वाटतं नव्हते. आमच्यामध्ये आरबीआयची आर्थिक भांडवल कार्यपद्धती आणि इतर मुद्यावरून मतभेत उभे राहिले होते. त्यानंतर लवकरच आमच्यामध्ये वैयक्तिक संबंधांबरोबरच कार्यालयातील संबंधही खराब झाले होते,” असं गर्ग यांनी म्हटलं आहे.

“सीतारामन यांनी अर्थ मंत्रालयाचा पदभार घेतल्यानंतर महिनाभरातच म्हणजे जून २०१९ मध्ये माझी बदली करण्याची मागणी केली होती आणि आग्रही धरला होता,” असं गर्ग यांनी म्हटलेलं आहे. सक्तीच्या नोटिशीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गर्ग हे ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी सेवेतून बाहेर पडले.