भारताच्या अमेरिकेतील राजदूत निरूपमा राव यांच्या राजनैतिक कारकीर्दीची मंगळवारी यशस्वी अखेर झाली. त्यांना निरोप देण्यासाठी परराष्ट्र कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीन व ब्राझीलसह अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. अमेरिकी राजनैतिक क्षेत्रातील अनेक अधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. सध्या भारताचे चीनमध्ये राजदूत असलेले एस जयशंकर यांची आता अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इतका काळ वेगाने निघून गेला याची कल्पनाही करवत नाही, असे श्रीमती निरूपमा राव यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या फॉगी बॉटम मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सांगितले. सोमवारी अमेरिकेच्या राजदूत म्हणून त्यांच्या कारकीर्दीचा शेवटचा दिवस होता. अत्यंत निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. श्रीमती राव या ६२ वर्षांच्या असून त्या अगोदर भारताच्या परराष्ट्र सचिव होत्या व नंतर भारताच्या अमेरिकेतील राजदूत झाल्या होत्या. परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया, चीन व श्रीलंका या देशातील राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले होते.
राजनैतिक कारकीर्दीत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, मोठी आशा व समाधान घेऊन आपण निवृत्त होत आहोत. भारताचे संबंध सर्वच देशांशी चांगले राहिले पाहिजेत त्यांच्याशी भागीदारी करताना एक वेगळे नाते निर्माण झाले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी श्रीमती राव यांना खास संदेश पाठवला होता तो या समारंभात वाचून दाखवण्यात आला. त्यांनी श्रीमती राव यांनी भारत-अमेरिका यांच्यातील संबंधात पार पाडलेल्या भूमिकेचे कौतुक केले असून आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीमती राव यांनी त्यांच्या निवासस्थानी गेल्या आठवडय़ात खास मेजवानी दिली, त्या वेळी अनेक अमेरिकी राजनैतिक अधिकारी व भारतीय-अमेरिकी समुदायाचे लोक उपस्थित होते. त्यात अमेरिकेच्या दक्षिण आशिया व मध्य आशिया विभागाच्या सहायक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल, रॉबर्ट ब्लेक, पॅट्रिक केनेडी यांचा समावेश होता.