पंजाब नॅशनल बँकेला चुना लाऊन देशातील सर्वांत मोठा बँकिंग घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीच्या भोवती आणखी फास आवळण्यात आला आहे. लंडनमध्ये मोदीला अटक झाल्यानंतर भारतातील त्याच्या संपत्तीची आता विक्री केली जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईमधील आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कोर्टाने नीरवची पत्नी अमी मोदीविरोधातही अटकपूर्व वॉरंट जारी केलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, पीएनबीमध्ये १३ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीच्या १७३ महागड्या पेंटिग्ज आणि ११ लक्झरी कर्स विकण्याला कोर्टाने मंजुरी दिली आहे. लिलावाच्या माध्यमांतून ही संपत्ती विकली जाणार आहे. नीरवने आपला मामा मेहुल चोक्सीसोबत मिळून हा घोटाळा केला आहे. मोदी आणि चोक्सी यांची केंद्रीय तपास पथक (सीबीआय) आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. आजवर दोघांची मिळून ४,७६५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.


स्फोटाने उडवला होता अलिबागमधील बंगला

नीरव मोदीचा अलिबागमधील समुद्र किनाऱ्यावरील बंगला काही दिवसांपूर्वी स्फोटाने उडवण्यात आला होता. ३०,००० चौ.फूट जागेवरील या बंगल्याची किंमत २५ कोटी रुपये इतकी होती.