विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य; अनुपम खेर यांना विमानतळावरच रोखले
काश्मीरमध्ये नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थेतील राज्याबाहेरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या असून आता तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे. दरम्यान, चित्रपट अभिनेते अनुपम खेर रविवारी एनआयटीला भेट देण्यासाठी श्रीनगरला गेले असता त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. आपण विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलो आहोत, असे खेर यांनी सांगितले तरी त्यांना रोखण्यात आले. एनआयटी ही संस्था काश्मीरबाहेर हलवण्याची मागणही फेटाळण्यात आली आहे. सण उत्सव साजरे करणे व हालचालींना प्रतिबंध न करणे या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेले दहा दिवस असेलला तणाव निवळला आहे. श्रीनगर येथील एनआयटीचे कुलसचिव फयाझ अहमद मीर यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांनी मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या पथकासमवेत केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी पास पद्धत रद्द करणे, मुलींना वसतिगृहात येण्याजाण्यावर घातलेले वेळेचे र्निबध उठवणे या मागण्यांचा त्यात समावेश होता. पास पद्धत रद्द करण्यात आली आहे. वसतिगृहात येण्याजाण्याच्या वेळा शिथिल करण्यात आल्या आहेत. एनआयटी प्रशासनाने सांगितले, की विद्यापीठ आवारात सण साजरे करण्यासाठी परवानगीची गरज लागणार नाही. खाणावळ, स्वच्छता, कर्मचाऱ्याची अरेरावी याबाबत तक्रारींची दखलही घेण्यात आली आहे.
११ एप्रिलला संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक होत असून त्यात सर्व मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. एनआयटी ही संस्था काश्मीरमधून हलवण्याची मागणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली आहे. काल सायंकाळी येथे १००-१५० मुलांनी मोर्चे काढले होते पण रविवारी सकाळी मात्र शांतता होती.