23 September 2020

News Flash

बाहेरील विद्यार्थ्यांच्या मागण्यांना स्थानिकांचा तीव्र विरोध

श्रीनगर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील वाद चिघळणार

| April 9, 2016 01:39 am

एनआयटीतील तणावाच्या पाश्र्वभूमीवर संस्थेच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

श्रीनगर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील वाद चिघळणार
येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी ही संस्था काश्मीरबाहेर नेण्यासह आपल्या इतर मागण्या लावून धरण्यासाठी संस्थेच्या परिसरात शुक्रवारी मोर्चा काढला. दरम्यान, स्थानिक काश्मिरी विद्यार्थ्यांनी बाहेरील विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांना विरोध केल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांनी हजरतबल भागातील या संस्थेच्या मुख्य द्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तळ ठोकून बसलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याच्या उद्देशाने निघालेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, परंतु नंतर ते परतले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीनगर एनआयटी काश्मीरबाहेर हलवली जावी, गेल्या मंगळवारी विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी आणि कथित राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या एनआयटीच्या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी, अशा मागण्या विद्यार्थी करत आहेत.
येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला न बसण्याची सूट आणि ती नंतर देण्याची परवानगी एनआयटीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना दिली. दरम्यान, विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारत हरल्यानंतर १ एप्रिल व ५ एप्रिल रोजी स्थानिक व राज्याबाहेरील विद्यार्थ्यांचा संघर्ष होऊन घडलेल्या हिंसाचाराची जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत १५ दिवसांत चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.
श्रीनगर एनआयटीच्या परिसरात केंद्रीय सुरक्षा दले कायमस्वरूपी तैनात करण्यात यावीत, यासह राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांना स्थानिक विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला आहे.
संस्थेच्या परिसरात सुरक्षा दलाच्या उपस्थितीमुळे बाहेरील राजकीय घडामोडींचा परिणाम होऊन येथे अशांतता पसरू शकेल, असे स्थानिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या चमूला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संस्थेतील शिक्षक बाहेरील विद्यार्थ्यांचा छळ करतात, हा आरोप शिक्षकांबद्दलच नव्हे, तर त्यांची निवड करणाऱ्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाबद्दलही अनादर दाखवणारा असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:39 am

Web Title: nit srinagar outstation students take out march
Next Stories
1 अर्जेटिनाच्या अध्यक्षांची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी
2 अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा
3 मंगळावर लघुग्रहांच्या आघातामुळे सजीवांना अनकूल स्थिती होती
Just Now!
X