लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याचा निती आयोगाचा प्रस्ताव हा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. निती आयोगाच्या या प्रस्तावामुळे केवळ उच्चवर्णीयांनाच फायदा मिळणार आहे. निती आयोगाने हा निर्णय घेताना मध्यम आणि कनिष्ठ वर्गाचा विचार का केला नाही, असा सवालही लालूप्रसाद यादव यांनी उपस्थित केला.

२०२४ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस निती आयोगाने काही दिवसांपूर्वी केला होती. निती आयोगाने त्यानुसार २०१७ ते २०२० या तीन वर्षांसाठीच्या अहवालाचा मसुदा तयार केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शिफारशीबाबत विचार करावा आणि त्यासंदर्भात रूपरेषा तयार करण्यासाठी संबंधितांचा कार्यगट नेमावा, अशी सूचनाही निती आयोगाने निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला आहे.

यावेळी लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. उत्तर प्रदेशात एका रात्रीत विकास होईल हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. उत्तर प्रदेशात राजदने पक्षांतंर्गत आणि राज्य स्तरावर विकासाच्यादृष्टीने चांगले संघटन केले आहे. मात्र, योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारला आपण चमत्कार करू, असे वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे, अशी टीकाही लालूंनी केली.

आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्यासाठी पंतप्रधान मोदी आग्रही

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीदरम्यान आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असावे, अशी कल्पनाही मांडली होती. वेळेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे अनेक चांगल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. यासोबतच अनेक चांगल्या उपक्रमांना वेळेचे व्यवस्थापन चुकल्यामुळे अपयश आले आहे. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी काही बदल आवश्यक आहेत,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी निती आयोगाच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले होते. मोदींच्या या सूचना अंमलात आल्यास देशाच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.