नीती आयोग उपाध्यक्षांचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना आव्हान

नवी दिल्ली : भारताने २०१४ पासून पीछेहाटीकडे मोठी झेप घेतली असल्याचे वक्तव्य करणारे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आव्हान दिले असून भारतात स्वच्छता, अधिक सर्वसमावेशक अर्थव्यवस्था यात यापूर्वी कुठल्या चार वर्षांत एवढे मोठे काम झाले होते हे सेन यांनी दाखवून द्यावे, असे कुमार यांनी म्हटले आहे.

राजीव कुमार यांनी सांगितले की,  नोबेल विजेते असलेल्या अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ थांबून मोदी सरकारने केलेल्या रचनात्मक सुधारणा पहाव्यात, वस्तुस्थिती पाहावी, अशी वक्तव्ये करण्यापूर्वी त्यांनी निदान चार वर्षांत मोदी सरकारने काय काम केले आहे याचा विचार करायला हवा होता.

अमर्त्य सेन यांनी सध्याच्या मोदी सरकारने देशाला मागे नेल्याची टीका केली होती त्याचा समाचार घेताना  राजीव कुमार म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत स्वच्छ भारत व सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेसाठी केलेले काम खूप मोठे आहे, एवढे मोठे काम इतर कुठल्या चार वर्षांत झाले आहे ते अमर्त्य सेन यांनी दाखवून द्यावे असे आव्हान मी देत आहे.

राजीव कुमार यांनी सांगितले की, आम्ही ज्या रचनात्मक सुधारणा केल्या आहेत त्यात आर्थिक विकासाचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर अमर्त्य सेन यांना मी सांगतो त्या गोष्टी पटत नसतील तर त्यांनी येथे काही काळ राहून त्याची माहिती घ्यावी.

गेल्या सात जुलैला भारत और उसके विरोधाभास या अ‍ॅन अनसर्टन स्टोरी- इंडिया अँड इटस काँट्रॅडिक्षन या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी सेन यांनी असे सांगितले होते की, भारत हा या प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा वाईट स्थिती असलेला देश आहे. गेल्या चार वर्षांत फारच घसरण झाली असून चुकीच्या दिशेने आपण गेलो आहोत. वाढत्या अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ावर तर आपण खूपच मागे गेलो आहोत. केवळ पाकिस्तानमुळे (पहिला क्रमांक) आपण दुसऱ्या क्रमांकाचे वाईट देश  ठरलो आहोत नाहीतर त्यातही पहिला क्रमांक लागला असता.