रखडलेले सिंचन प्रकल्प आणि गंगा शुद्धीकरणाचे आव्हान स्वीकारल्याची गडकरींची गर्जना

‘पाण्याचा थेंब ना थेंब वाचविणे हेच माझ्या जीवनाचे मिशन आहे. गंगा शुद्धीकरणाचे आणि रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या आव्हानांची मला कल्पना आहे, पण त्याचबरोबर कामे कशी करवून घ्यायची, हेही मला पक्के ठाऊक आहे. मी अशक्य ते शक्य करून दाखवीन..’

जलसंपदा, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण या तिसऱ्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर रस्ते, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी सोमवारी बोलत होते. ‘मी स्वत: शेतकरी आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व मी जाणतो. २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी पाणी अडविल्याशिवाय, जिरविल्याशिवाय पर्याय नाही. किमान पन्नास टक्के तरी शेती सिंचनाखाली आली पाहिजे. तरच आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकतो. शेतकऱ्यांशिवाय देश नाही आणि सिंचनाशिवाय शेतकरी नाही. म्हणून तर सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करीन. त्यातील सर्व अडथळे दूर करीन, असे गडकरींनी आत्मविश्वासाने सांगितले.

‘गंगेच्या शुद्धीकरणामधील सर्व आव्हानांची मला कल्पना आहे. पण कठोर राजकीय इच्छाशक्तीचे भांडवल असल्यास कोणतेही काम अशक्य नाही. सर्वकाही शक्य करून दाखवीन. अडथळे दूर करण्यासाठी उमा भारतींचा समावेश असलेले कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करेन,’ असेही ते म्हणाले.

या वेळी मावळत्या मंत्री उमा भारती आवर्जून उपस्थित होत्या. त्याचबरोबर या खात्याचे दोन नवे राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह आणि अर्जुन मेघवाल यांनीही पदभार स्वीकारला. योगायोगाने हे दोन्ही राज्यमंत्री निवृत्त नोकरशहा आहेत. सत्यपालसिंह हे माजी आयपीएस, तर मेघवाल हे माजी आयएएस आहेत. गंगा शुद्धीकरण योजना कासवगतीने राबविली जात असल्याच्या कारणावरून उमा भारतींऐवजी गडकरींवर हे तिसरे मंत्रालय दिले गेले आहे. नाराज उमा भारतींनी रविवारी सकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्याला दांडी मारली होती.

दरम्यान, नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सकाळी गडकरींची सदिच्छा भेट घेतली. पक्षप्रवक्त्याच्या रूपाने सीतारामन यांना पहिली संधी गडकरींनी दिली होती.

उमा भारतींच्या दु:खावर  कौतुकाची फुंकर

जलसंपदा व गंगा शुद्धीकरण मंत्रालय काढून घेतल्याची नाराजी अवघडलेल्या उमा भारतींच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण उमा भारतींच्या कामगिरीचे वारंवार कौतुक करून गडकरींनी हळुवार फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. ‘उमाजींचे गंगेशी भावनिक नाते आहे. त्यांनी तिच्या शुद्धीकरणासाठी उत्तम प्रयत्न केले. बहुतेक प्रकल्पांच्या निविदा निघाल्यात. त्यामुळे जेवणाची सर्व तयारी झाली असताना फक्त जेवणाच्या ताटावर बसण्यासारखा हा प्रकार आहे. उमाजींनी दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची जबाबदारी माझ्यावर आहे,’ असे गडकरी म्हणाले. ‘मी तर स्वत:ला त्यांची राज्यमंत्रीच समजते. इतके मार्गदर्शन, सहकार्य गडकरींनी मला केले आहे. मी गंगा शुद्धीकरणासाठी प्रारंभीची आहुती दिली, पण आता गडकरीच पूर्णाहुती देतील,’ असे सांगत उमा भारतींनी गडकरींवर स्तुतिसुमने उधळली.

गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे. त्याद्वारे रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणाचा मार्ग प्रशस्त होईल. त्याचा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न असेल.  

–  पीयूष गोयल, (रेल्वे मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर)