05 March 2021

News Flash

अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा!

दिरंगाईबाबत नितीन गडकरी यांचा संताप

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. अकार्यक्षम कर्मचारी-अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होतो. याच अधिकाऱ्यांमुळे प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होतात, अशा शब्दांत गडकरी यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.

दिल्लीतीलद्वारकामध्ये प्राधिकरणाच्या कार्यालय इमारतीचे गडकरी यांनी दूरचित्रसंवाद माध्यमातून उद्घाटन केले. एखादे काम पूर्ण झाले की, संबंधितांचे अभिनंदन करायचे असते. पण, ही इमारत बांधल्याबद्दल तुमचे अभिनंदन करणार कसे? २००८ मध्ये ही इमारत बांधण्याचा निर्णय झाला, २०११मध्ये निविदा काढल्या. हे २०० कोटींचे काम पूर्ण व्हायला तब्बल नऊ वर्षे लागली. तोपर्यंत केंद्रात २ सरकारे आली आणि प्राधिकरणाचे ८ अध्यक्षही बदलले. ज्या ‘महान’ अधिकाऱ्यांनी इमारत उभी करण्यासाठी नऊ वर्षे लावली, संबंधित मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक यांची छायाचित्रे या इमारतीत लावली पाहिजेत. तातडीने निर्णय घेऊन त्यावर अंमल न करण्याच्या प्रवृत्तीमुळे काम पूर्ण होण्यात दिरंगाई झाली. हा त्यांचा इतिहास छायाचित्रे लावून नोंदवता येईल, अशी उपहासात्मक टिप्पणी गडकरी यांनी केली.

कामात दिरंगाई झाली तर कंत्राटदाराला जबाबदार धरले जाते, तशी आता फाइलही तयार केली जाईल पण, या कामाबद्दल मला माहिती आहे. मी ३-४ बैठकाही घेतलेल्या होत्या. प्राधिकरणात निर्णय न घेणे, कामात गुंतागूंत वाढवणे ही विकृत प्रवत्ती आहे. १२-१३ वर्षांपासून हे अधिकारी प्राधिकरणात बसले आहेत. त्यांच्या आत्मीयता आणि प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही पण, त्यांची विचारसरणी नकारात्मक आहे. ते एखाद्या विषकन्येसारखे आहेत. हेच अधिकारी प्राधिकरणात सगळ्यांचे मार्गदर्शक बनले आहेत. मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकारी किती नालायक असू शकतात, हे या प्रकल्पातील दिरंगाईवरून सिद्ध होते, अशी तीव्र टीका गडकरी यांनी केली.

आयआयटीतून आलेले होतकरू तरुण सरकारी विभागांमध्ये टिकत नाहीत मग, आपण ज्यांना भरती करून घेतो तो अधिकारी दुय्यम दर्जाचा असतो. असे अधिकारी प्राधिकरणात खूप आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना पदोन्नतीही दिली जाते. हे अधिकारी प्राधिकरणाच्या सदस्यांना न सांगता महत्त्वाचे निर्णय घेतात. मंत्रालयालाही ते विचारत नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात फेरबदल होण्याची गरज असल्याचे परखड मत गडकरी यांनी व्यक्त केले.

सुमारे एक लाख कोटींचा दिल्ली-मुंबई महामार्ग प्रकल्प तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. पण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या २०० कोटींच्या इमारतीस अधिकाऱ्यांनी नऊ वर्षे लावली. अधिकाऱ्यांच्या या अकार्यक्षमतेची मला लाज वाटते.

-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:26 am

Web Title: nitin gadkari angry over officers delay abn 97
Next Stories
1 दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी कायदा
2 द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे दोन मंत्री भारतात
3 अमेरिकेत निवडणुकीचा निकाल लांबण्याची शक्यता
Just Now!
X